‘मराठीला कोणी संपवू शकणार नाही’ | |
मराठी मायबोली आहे, तिला कोणीही संपवू शकणार नाही, त्यामुळे युवकांनो तुम्ही राजकीय षड्यंत्राचे बळी पडू नका, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे महासचिव मनोज आखरे यांनी केले. संभाजी ब्रिगेडमुळे सिंधुदुर्गातील दादागिरी व गुंडगिरी संपुष्टात येईल, असा इशारा ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी देऊन मायनिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्यांना धडा शिकवू असे ते म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा संभाजी ब्रिगेडची स्थापना करण्यात आली. ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांचा ५५वा वाढदिवस संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेने साजरा करण्यात आला. यावेळी शिवराम राजे पुतळ्यास प्रथम पुष्पांजली वाहिल्यानंतर तेथून गवळी तिठापर्यंत मिरवणुकीने मेळाव्यात संभाजी ब्रिगेडची स्थापना करण्यात आली.
यावेळी ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांना वाढदिनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. विचार मंचावर संभाजी ब्रिगेडचे महासचिव मनोज आखरे, संघटक सोमेश्वर आहेर, मराठा सेवा समाजाचे रावराणे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुनील राऊळ आदी उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडची झेंडा स्थापना करून स्थापना करण्यात आली. त्यावेळी बोलताना महासचिव मनोज आखरे यांनी मराठा समाजासह बहुजन समाज संघटित करून दिशाहीन तरुणांना वैचारिक, आर्थिक क्रांतीचा मार्ग दाखविण्यासाठी संभाजी ब्रिगेडची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. युवक क्रांती घडवू शकतात म्हणूनच परिवर्तन घडवून आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड कार्यरत आहे. सामाजिक व सांस्कृतिक दहशतवाद निपटून काढण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.
संभाजी ब्रिगेडची स्थापना झाल्याने यापुढे सिंधुदुर्गात कोणाचीही दादागिरी, गुंडगिरी चालणार नाही. मायनिंग प्रकल्प राबवून शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्यांना धडा शिकविला जाईल, असा इशारा ब्रिगेडीअर सावंत यांनी दिला.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊळ यांनी नजीकच्या काळात संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात वैभव प्राप्त करून दाखवेल, असे उद्गार काढले. यावेळी मराठा सेवा समाजाचे रावराणे व संभाजी ब्रिगेडचे संघटक सोमेश्वर आहेर यांनी संभाजी ब्रिगेडची कार्यप्रणाली कथन केली.
प्रास्ताविक सुनील राऊळ, सूत्रसंचालन काका सावंत, तर आभार प्रदर्शन हर्षवर्धन धारणकर यांनी केले.
No comments:
Post a Comment