Monday, December 28, 2009

शिवस्मारक आदर्शवत व्हावे - संभाजी ब्रिगेड
सकाळ वृत्तसेवा
Saturday, May 30th, 2009 AT 11:05 PM
Tags: sambhaji brigade, shivdharma
कोल्हापूर - बहुजन इतिहास संशोधकांची मते घेऊन मुंबईतील शिवस्मारक नवीन पिढीला आदर्श ठरावे, अशी अपेक्षा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील व मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली.
दरम्यान, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी समितीचा मीच अध्यक्ष असल्याचा खुलासा काल केल्याने या वादावर पडदा पडला आहे. श्री. पाटील, डॉ. चव्हाण म्हणाले, ""समितीच्या सदस्यपदावरून बाबासाहेब पुरंदरे यांना दूर करावे. त्याचबरोबर मराठी माणसांसाठी काम करण्यापेक्षा भांडणे लावणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथम आपली मुले मराठी माध्यमाच्या शाळेत घालावीत.'' डॉ. चव्हाण म्हणाले, "जगाला आदर्श ठरेल असे शिवस्मारक मुंबईत व्हावे, ही मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. स्मारकाचा वाद हा पुरोगामी व प्रतिगामी शक्तींमधील आहे. श्री. पुरंदरे यांनी कोणत्याही संशोधनाशिवाय, संदर्भाशिवाय शिवाजी महाराजांविषयी लिहिलेली पुस्तके सुमार दर्जाची व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची अवहेलना करणारी आहेत. त्यांनी 2003 मध्ये लिहिलेल्या "राजा शिवछत्रपती' पुस्तकातील लिखाण वाचल्यानंतर जेम्स लेन यांच्या पुस्तकाचे मूळ कोठे आहे, हे समजून येते.''
ते म्हणाले, "श्री. पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखालील पुण्यातील लालमहाल, डेरवण (जि. रत्नागिरी) व सोलापूर येथे उभारलेली शिवसृष्टी वादाच्या भोवऱ्यात आहे. युती शासनाच्या काळात त्यांना पुणे जिल्ह्यातील दिलेल्या 25 एकर जमिनीवर काहीही झालेले नाही. आमचा वाद हा श्री. पुरंदरे किंवा राज ठाकरे यांच्याबद्दल नाही, तर वर्षानुवर्षे चाललेल्या सांस्कृतिक दहशतवादाबाबत आहे. म्हणून बहुजन इतिहास संशोधकांची मते घेऊन मुंबईतील स्मारक नवीन पिढीला आदर्श ठरावे.''

No comments: