Monday, December 1, 2008


मराठा समाजातील लोकांनी काळाप्रमाणे बदलावे - पुरुषोत्तम खेडेकर
नांदेड, ता. ३० - मराठा समाजातील लोकांनी मराठी, हिंदी, इंग्रजी शिक्षणावर भर दिला पाहिजे. तेलगू, कानडी, जर्मनीही शिकायला पाहिजे. ज्याच्या घरात नाही ग्रंथाचे कपाट, तो होईल सपाट. मराठा समाजातील लोकांनी आता काळाप्रमाणे बदलले पाहिजे. फुकट कोणी देणार नाही; म्हणूनच जमेल ते उद्योग उभारा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या पाचव्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या समारोपात रविवारी (ता. ३०) केले. श्री. खेडेकर म्हणाले, मराठी चित्रपटांत पाटलाची भूमिका बहुतांशपणे निळू फुले करतात. सगळेच पाटील वाईट असतात का हो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिक्षणमंत्री वसंत पुरके हे चांगले निर्णय घेणारे मंत्री आहेत. शालेय पाठ्यपुस्तकात त्यांच्यामुळेच अनावश्‍यक भाग वगळला जातो. त्यामुळे या कर्तबगार मंत्र्याचे अभिनंदन केले पाहिजे. मराठीचा वाद तुम्हा-आम्हाला मातीत घालणारा आहे. आम्हाला मराठी राज्य नको, मराठा राज्य हवे आहे, असेही ते म्हणाले. मराठा समाजातील लोकांना आरक्षण सुविधा द्याव्यात, याबाबत आपली मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी चर्चा झाली आहे. कृषिमंत्री शरद पवार, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ यांनाही बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला पूर्ण मंजुरी दिली आहे. आता फक्त तांत्रिक बाबी तेवढ्या शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे या सर्वांचे आभार मानू. शिवधर्म ही माझी संकल्पना मराठा समाजातील लोकांना आता पटली आहे. समाजातील पाच कोटी लोकांपैकी दोन ते अडीच कोटी लोक शिवधर्माचे आचरण करत आहेत. शिवधर्मामुळे मराठा समाजाचे २० हजार कोटी रुपये वाचले आहेत, असेही ते म्हणाले. या प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार बी. बी. ठोंबरे यांना सन्मानपूर्वक देण्यात आला. श्री. ठोंबरेंच्या कार्याचे कौतुक खेडेकरांनी केले. सुरेश हावरे यांनासुद्धा छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार होते. ते समारंभाला आले नाहीत. या वेळी माधवराव पाटील शेळगावकर, चंद्रभान पाटील जवळेकर आदींची उपस्थिती होती. चौथ्या सत्रात "तुकोबांचे वारकरी ः संभाजी ब्रिगेड' या विषयावरील परिसंवाद रंगला. या वेळी छाया महाले म्हणाल्या, मुंबईत बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या. अतिरेक्‍यांकडील शस्त्रास्त्रे अत्याधुनिक होती. आमच्याकडील हत्यारे मात्र बाबा आझमच्या काळातील होती. आमच्याजवळची हत्यारे, बंदुका कोणत्या काळातील आहेत, हे तपासून पाहिले नाही. त्यामुळेच हेमंत करकरेंसारखे अनेक अधिकारी शहीद झाले. करकरे हे तुकारामांचे वारकरी. अतिरेक्‍यांनी करकरे यांना संपवले. मराठा माणूस हा केव्हाही मरायला तयार असतो. मोडेल पण वाकणार नाही, असा त्याचा बाणा असतो. या वेळी सत्कारास उत्तर देताना बी. बी. ठोंबरे म्हणाले, की मी आज धन्य झालो. ज्या समाजात मी जन्मलो, त्या समाजाने मला हा बहुमान दिला आहे. संयोजक-अध्यक्षांचे मी ऋण व्यक्त करतो.

उन्नतीसाठी प्रक्रिया उद्योग काढावेत - ठोंबरे

या कार्यक्रमप्रसंगी सत्कारमूर्ती बी. बी. ठोंबरे म्हणाले, स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागाची उन्नती करायची असेल, तर शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग काढावेत. भाजीपाल्यावर प्रक्रिया करणारे उद्योग, सोयाबीनवर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू केले तर ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होईल. अर्थसत्ता महत्त्वाची आहे. सांगणे सोपे असले तरी कृती अवघड आहे. मात्र तुम्ही संकल्प केला तर ते काही अवघड नाही. कचऱ्यावरच्या वीज निर्मितीचा प्रयोग आम्ही करतो. भाजीपाल्याचा प्रयोग औसा येथे केला. सेंद्रिय पद्धतीनुसार शेती करून भाजीपाला पिकवला व पॅकिंग करून तो मोठ्या शहरात पाठवला तर चार पैसे निश्‍चितच अधिक मिळतील. जगात अन्नधान्याची टंचाई निर्माण होणार नाही. शेती व्यवसायाला सोन्याचे दिवस येणार आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.

'मराठा समाजभूषण' पुरस्कार प्रदान

मराठवाड्यासारख्या मागास भागात खासगी साखर कारखानदारी निर्माण करून विविध विकास कामे उभी करणाऱ्या 'नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांना मराठा सेवा संघाच्यावतीने दिला जाणारा 'मराठा समाजभूषण पुरस्कार' रविवारी लातूर येथे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी बोलताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी आजची लढाई ढाल तलवारीची नसून ज्ञानाची आहे. त्यामुळे संगणक साक्षरता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे अवाहन केले. यावेळी डॉ. साहेबराव खंदारे यांच्या 'मराठ्यांचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास' या पुस्तकाचे प्रकाशन झाले.